#खुडी

प्रभु परशुरामाने निर्माण केलेली पावन भुमी म्हणजे कोकण! याच नयनरम्य कोकणातील देवगड-लिंगडाळ-आचरा मार्गावरील देवगड पासुन २० आणि आचरापासुन १० कि.मी. वर वसलेले एक सुंदर गाव म्हणजे #खुडी.कोकणातील निसर्गसौंदर्याने नटलेल्या गावांमध्ये ज्यांचे नाव घ्यावे असा एक अतिशय सुंदर गाव.

   कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो निळाशार समुद्र. निसर्गाची अद्भुत अदाकारी म्हणजे निलवर्णी समुद्र. जी कोकणची शाण आहे. पण या खुडी गावाला समुद्र किनारा नाही. खुडीच्या सिमेवर असलेल्या मुणगे या गावाला समुद्र लाभला आहे. परंतु समुद्राच्या अभावामुळे खुडी गावाच्या लौकिकात जराही उणीव भासत नाही. समुद्र नसला तरीही समुद्राच्या तोडीस तोड डेणारे नदी,नाले व खुडी गावाची शान असे खोड्याळ तलाव आहे. खुडीचे धडधडते ह्‌दय अशी या तलावाची ओळख आहे. खोड्याळ तलावाच्या शेजारी असलेला निसर्ग सौंदर्याने नटलेला डोंगर म्हणजे खुडी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा. गावाच्या पुर्वेकडुन दक्षिणेकडे वाहणारी गंगामाई,गावाच्या चारी बाजुंनी असलेल्या उंच डोंगररांगा व गर्द झाडी,पावसाळ्यात याच डोंगर रांगातुन वाहवारे,खळखळणारे धबधबे,नदीनाल्यांना असलेले बंधारे यासारख्या अनेक सृष्टीसौंदर्याने नटलेला-गजबजलेला हा गाव. देऊळवाडी,आरेकरवाडी,जुवीवाडी,घरटणवाडी,

तळीवाडी,बौद्धवाडी,वावुरवाडी,कावलेवाडी,शिंदेवाडी,मेस्त्रीवाडी,खालचीवाडी,वागदेवाडी,जामवाडी,पन्हळीवाडी आणि खुडीपाटवाडी अशा १५ वाडींचा हा गुण्यागोविंदाने राहणारा गाव. कोणताही ऐतिहासिक वारसा नसताना गावाने जिवनाच्या कला,क्रिडा,शिक्षण,आरोग्य अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये या गावाने विकास साधला आहे. गावामध्ये नुकतीच 'प्राथमिक आरोग्य केंद्र खुडी' ची ईमारत बांधुन पुर्णत्वास गेली आहे. आता प्रतिक्षा आहे ती फ़क्त वैद्यकीय साहीत्याची आणि डाँक्टरांची. त्यामुळे लोकांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होत आहेत. गावामध्ये पहीली ते सातवी पर्यंत शाळा होती. आता खुडी ग्रामविकास मंडळ खुडी-मुंबई यांच्या अथक प्रयत्नामुळे आठवी ते दहावी पर्यंत हायस्कुलही चालु करण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षणासाठी बाहेरगावी जाण्यासाठी मुलांची होणारी दमछाक पुर्णपणे बंद झाली आहे. या शाळेमध्ये विविध प्रकारचे प्रोत्साहनपर कार्यक्रम राबवले जातात. विविध मेरेथाँनस्पर्धा,बौद्धिकस्पर्धा,संगितस्पर्धा,नृत्यस्पर्धा अशा अनेक स्पर्धा राबवल्या जातात व मुलांच्या कलागुणांना वाव दिला जातो. २००८ साली #सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट धावपटु आणि सर्वोत्कृष्ट उंचउडीपटु म्हणुन येण्याचा मान खुडी गावातील #अमर विट्ठल आरेकर( सिंधुदुर्ग जिल्हा सर्वोत्कृष्ट धावपटु )आणि #बाळु धोंडु घाडी (सिंधुदुर्ग जिल्हा सर्वोत्कृष्ट उंचउडीपटु ) यांनी मिळवला होता.यांनी आपल्या शाळेसहित आपल्या गावाचा झेंडा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या अभिमानाने फ़डकवला. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात खुडी गावाचे नाव सुवर्ण अक्षरांनी नोंदवले.

    कोकण म्हणजे कलेचा प्रांत! हे कोकण भजन, किर्तन व दशावतार कलेसाठी प्रसिद्ध.याच डबलबारी भजन कलेत आज संपुर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात विनोदाचे सम्राट म्हणुन ज्यांचे नाव अगत्याने घेतले जाते ते  बुवा श्री. संतोष जोईल आणि आपल्या पहाडी आवाजाने भाविकांना मंत्रमुग्ध करणारे  बुवा. श्री किरण शिद्रुक अशी ही दोन भजनरत्ने खुडी गावाला लाभली आहेत. दशावतार क्षेत्रातही खुडी गावाने आपला खास ठसा उमटवला आहे. श्री. हेदुबाई गणेश दशावतार नाट्य मंडळ खुडी आणि श्री. भुतेश्वर दशावतार नाट्य मंडळ खुडी अशी दोन नाट्यमंडळे गावात आहेत. ह्यांनी आज आपल्या  कलांगुणांमुळे  कोकणासह मुंबईत नावलौकिक मिळवला आहे.
    हिरव्यागार डोंगरद-यांच्या कुशीत वसलेल्या खुडी गावाचे  ग्रामदैवत मायमाउली #श्री_देवी_हेदुबाई! याशिवाय गावात महालक्ष्मी, कुलस्वामीनी, भुतेश्वर, गांगेश्वर, हनुमान, श्री गणेश आणि वाघदेश्वर आदी. मंदिरे व देवस्थाने आहेत. प्रत्येक देवस्थानाला स्वत:चा वैशिष्ट्यपुर्ण  असा इतिहास आहे.
     अखंडनिवासिनी मायमाउली श्री. देवी हेदुबाई म्हणजे खुडीवासीयांचे ग्रामदैवत. पुर्वी गुराखी गुरे चरवण्यासाठी मळय येथे जात असत. एके दिवशी एका गुराख्याचा लक्ष एका झाडाखाली गेला. तेथे झाडाखाली एक पाशाण होते. त्या गुराख्याने ही गोष्ट गावक-यांना सांगितली. दुस-या दिवशी सगळे गावकरी गेले आणि पाहीले असता ते पाशाण देवीचे होते. गावक-यांनी पाशाणाला त्याच हेदीच्या झाडाखाली ठेवायचा विचार केला. त्या ठिकाणी गवताची खोपटी बांधली. एक गुराखी दररोज देवीपुढे दिवा लावायचा. काही वर्षानंतर गुराखी दिवा लावुन घरी जात होता. कावळ्याने दिव्यातील वात नेऊन खोपटीवर ठेवली. खोपटी पेटायला लागली. खोपटी पेटताना पाहुन गु-याख्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग काही विजेना ही बातमी गावक-यांना समजली. गावक-यांनी मुर्ती गावात स्थापित करायचे ठरवले. ही मुर्ती डोंगरीच्या भरडावर स्थापन करायचे असे ठरले. आणि डोंगरीच्या भरडावर उदयास आली एक भव्य-दिव्य वास्तु. देवीला या मंदिरात स्थापन करण्यात आले. आता गावक-यांसमोर प्रश्न पडला देवीला कोणत्या नावाने हाक मारायची? काही गावक-यांनी सांगितले की, देवीचे पाशाण हेदिच्या भाटीत होते म्हणुन देवीला #हेदुबाई असे नाव ठेऊया. म्हणुन त्या मुर्तीला नाव पडले #खुडी_गावाचे_ग्रामदैवत_मायमाउली_श्री_देवी_हेदुबाई! येथे आल्यावर समस्त भाविकांना लाभते संपुर्ण शांती, समाधान आणि प्रसन्नता. मंदिराच्या सभोवती जुनाट वृक्षांची दाटीवाटी, काजु,आंबा,फ़णस यांची वृक्ष आणि महाकाय वटवृक्ष तसेच मोहोर व फ़ुले यांचा वेगळाच गंध अशा विविधांगी निसर्गाची मुक्त उधळण येथे अनुभवास येते. भव्य स्वरुपातील श्री देवी हेदुबाई मंदिर प्रवेशद्वारावरील पायरीला स्पर्श करताच दिमाखदारपणे उभी असलेली मंदिराची वास्तु नजरेस पडते. मंदिराच्या समोर तीन दिपमाळ आहेत. शेजारी भावय देवीचे मंदिर आहे. मंदिरात सुंदर व आकर्षक मुर्ती आहे. हेदुबाई मंदिराच्या चारी बाजुला चिरेबंदी तटबंदी आहे.
    मंदिरात श्रावणी सोमवार, त्रिपुरारी पौर्णिमा आणि हरीनामसप्ताह इ. उत्सव मोठ्या थाटामाटाने साजरे केले जातात. दरवर्षी कार्तिक शुद्ध उत्तप्त्ती एकादशीला सुरु होणारा #हरीनाम_सप्ताह म्हणजे हजारो भाविकंचा कुंभ-मेळाच होय. घटस्थापना करुन हरीनाम सप्ताहाची सुरुवात होते. अष्टप्रहर अखंड टाळ मृदुंगांच्या नाद लहरींमध्येविठुरायाचे  गुणगान गायिले जाते. देवगड,कवकवली,मालवण सहित वैभववाडी तालुक्यातील भजनीमेळे आपल्या सुस्वर स्वरांनी खुडीनगरीला प्रती पंढरपुर नगरीच बनवतात. संपुर्ण आवार हरीनामाने दुमदुमुन जाते. एकादशीपासुन रोज रात्री सात दिवस देवी हेदुबाई  माऊलीची पालखी  ढोल,ताशे,टाळ यांच्या गजरात विठुरायाच्या नामघोषात मंदीराभोवती प्रदक्षिणा करते.या हरीनाम सप्ताहात देव दिवाळीची रात्र तर भाविकांना भक्तीभावाची पर्वनीच देउन जाते. हे हरीनामपर्व डोळ्याचे पारणे फ़ेडणारे असते. या सोहळ्यास भाविक आवर्जुन उपस्थिती लावतात. आठव्या दिवशी सकाळी ५ वाजता काकडी आरत करुन त्यानंतर हंडी फ़ोडुन हरीनाम सप्ताहाची सांगता केली जाते. या दिवशी मंदिरामध्ये गावजेवण असते. या दिवसापासुन ८ दिवसांनी वार्षिक पारंपारीक दशावतार नाट्यप्रयोग आयोजित केला जातो.

महालक्ष्मी मंदिर

मळय येथे आगार या ठिकाणी भट लोकांची वस्ती होती. तेथुन १०० मीटर वरती डोंगरावर हे मंदिर आहे. हे भटजी देवीची पुजा करायला तिथे जायचे. तेथील एका भटजीच्या स्वप्नात देवी येउन तीने तीला रेड्याचा बळी हवा असे सांगितले (असे जाणकार सांगतात.) हा सर्व त्या जागेचा परीणाम आहे असे त्या भटजींना वाटु लागले तसेच भटजींना रेड्याचाबळीम्हणजे भ्रष्ट असल्याने त्यांनी ती जागा सोडायची ठरवली. आणि मंदिरातले पाशाण घेऊन ते निघुन गेले. पुर्वी त्या मंदिरात महालक्ष्मीचे पाशाण होते म्हणुन त्या मंदिरास महालक्ष्मी मंदिर असे नाव पडले. ते भटजी महालक्ष्मीची मुर्ती घेऊन मुंबईला गेले. मुंबईला समुद्र किनारी रहायला लागले. त्या भटजींनी महालक्ष्मीचे पाशाण तेथे स्थापन केले म्हणुन खुडी गावचे आराध्य दैवत महालक्ष्मीचे मंदिर मुंबईमध्ये उभे आहे. तीची कृपादृष्टी सदैव मुंबईकर गावकरांच्या पाठिशी आहे.

  खुडीच्या सौंदर्याचे व प्रगतीचे वर्णन करायला शब्द नक्किच कमी पडतील.प्रत्येक ऋतुत देहभान विसरायला लावणारी रुपे पाहणे म्हणजे स्वर्गीय आनंद! जे-जे खुडीच्या या पुण्य भुमित पोहोचले ते पुन्हा पुन्हा या भुमित येत राहीले.असे हे खुडीचे छोटेसे दर्शन घडवुन तुम्हाला मी एकच गोष्ट सांगतो,"येवा येवा खुडी आमची आसा आणि खुडीत तुमचा स्वागत आसा."

माहीती साभार :बाळु घाडी,अमर आरेकर,प्रविण टेंबुलकर आणि महालक्ष्मीट्रस्ट मुंबई

माहीती संकलक व लेखक: #अमर_आरेकर