कृषी - औद्योगिक क्रांतीचे प्रणेते : वसंतराव नाईक

         ● डॉ. सुभाष राठोड, पुणे
   नवमहाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्या थोर शिल्पकारांची नावे इतिहासाच्या सुवर्ण पटलावर कोरली गेली आहेत त्यात स्वतंत्र महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. वसंतराव नाईक यांची आज जयंती. त्यांची जयंती “कृषिदिन’ म्हणून साजरी होते.
   आजच्या प्रगतशील महाराष्ट्राला योग्य दिशा दिली ती वसंतराव नाईकांनी. नवमहाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्याकडून चालत आलेला नेतृत्वाचा वारसा वसंतराव नाईक यांनी अतिशय समृद्ध आणि संपन्न केला. महाराष्ट्रात केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, औद्योगिक अशा अनेक क्षेत्रांमध्ये वसंतराव नाईकांचे नाव आदराने घेतले जाते. ते सलग अकरा वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी राहिले.
   महाराष्ट्राच्या इतिहासातील हा केवळ विक्रमच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाचे सुवर्णयुग म्हणावे लागेल. वसंतराव नाईक यांची कारकीर्द सुस्थिर सरकार व गतिमान विकास यासाठी उल्लेखनीय ठरलेली आहे. त्यांना आधुनिक महाराष्ट्राच्या “कृषी - औद्योगिक क्रांतीचे प्रणेते’ म्हणून ओळखले जाते.
  वसंतराव नाईकांचा जन्म 1 जुलै 1913 रोजी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्‍यात गहुली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव फुलसिंग नाईक व आईचे नाव होणुबाई असे होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अनेक मैल पायपीट करत आई - वडिलांच्या महत्त्वाकांक्षेमुळे अतिशय जिद्दीने त्यांनी शिक्षण घेतले. 1940 मध्ये ते कायद्याचे पदवीधर झाल्यानंतर सुरुवातीला डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद, यवतमाळ, नागपूर येथे वकिली केली.
  वसंतरावांनी आपली जीवनरूपी नौका समाजरूपी महानगराच्या उद्धाराकडे वळवली. 1959 मध्ये गोरगरिबांच्या मुलांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून पुसद येथे फुलसिंग नाईक महाविद्यालयाची स्थापना केली. प्रारंभी पुसद तालुक्‍यातील आदर्श ग्राम चळवळीत त्यांनी पुढाकार घेतला. सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे नाईक 1946 मध्ये पुसद नगरपरिषदेवर निवडून आले आणि नगराध्यक्षही झाले. आपल्या कार्यकुशलतेमुळे 1952 मध्ये ते तत्कालीन मध्य प्रदेश विधानसभेवर पुसद मतदारसंघातून निवडून आले आणि मध्य प्रदेश मंत्रिमंडळात महसूल खात्याचे मंत्री झाले.
   1 नोव्हेंबर 1956 रोजी यशवंतराव चव्हाण हे द्विभाषिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात वसंतराव नाईक सहकार मंत्री झाले. 1957 साली त्यांना त्यांच्या आवडीचे कृषी खाते मिळाले. मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन त्यांनी कृषिसिंचन आणि सहकार क्षेत्रात भरीव कार्य केले.
  1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर नाईक हे महसूल मंत्री झाले. याच काळात त्यांनी लोकशाही विकेंद्रीकरण समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा अहवाल त्यांनी तयार केला आणि महाराष्ट्रात ' 'पंचायतराज’ची मुहूर्तमेढ रोवली. सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती यांना व्यापक अधिकार मिळाले. त्यातूनच ग्रामीण नेतृत्व आकारास आले. ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यात आजही स्थानिक स्वराज्य संस्थांचा मोठा वाटा राहिलेला आहे.
सन 1963 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांचे अकाली निधन झाल्यानंतर 5 डिसेंबर 1963 रोजी वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुख्यमंत्रिपदाच्या तिन्ही वेळच्या कारकिर्दीत विधानमंडळाच्या माध्यमातून विरोधी पक्षाला विश्‍वासात घेऊन जनहिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. या काळात जायकवाडी, उजनी, पेंच, धोम, अप्पर, वर्धा अशी अनेक धरणे तर कोराडी, पारस, परळी, खापरखेडा, पोफळी, भुसावळ यासारख्या विद्युत प्रकल्पांची उभारणी केली.
 शेतकरी सुखी झाला तर अवघा देश सुखी होईल, असे मानून शेती आणि मातीवर श्रद्धा असणाऱ्या नाईक यांनी 'शेतात पाणी आणि वीज’ हेच सूत्र प्रमाण मानून अहोरात्र मेहनत घेऊन कार्य केले. राज्याचा औद्योगिक विकास झपाट्याने व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या कामाला गती दिली. काळ्या मातीचे “हिरवे स्वप्न’ साकार करणारा हा भूमिपुत्र म्हणत असे की, मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसलेलो असलो तरीदेखील मी शेतीच्या बांधावर बसलेलो आहे.
 शेती उत्पादनात वाढ, अन्नधान्यात स्वयंपूर्णता, सहकारी संस्थांना बळकटी, साक्षरतेचा प्रसार, भटक्‍या-विमुक्‍तांसाठी स्वतंत्र आरक्षण, दुर्बल घटकांना साहाय्य, मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा, मुंबईतील जुन्या चाळींची पुनर्बांधणी, नवी मुंबई, नवीन औरंगाबादची निर्मिती, चार कृषी विद्यापीठांची स्थापना, कापूस एकाधिकार योजना, पाणी आडवा पाणी जिरवा, हरितक्रांती, धवलक्रांती यासारख्या अनेक दूरगामी विकास योजनांची त्यांनी प्रभावी अंमलबजावणी केली. वसंतरावांनी त्यांच्या कार्यकाळात सामाजिकदृष्ट्या पुरोगामी, औद्योगिकदृष्ट्या प्रगत आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न अशा महाराष्ट्राची उभारणी केली.
   कोयना धरण परिसरातील भूकंपाच्या वेळी अतिशय संवेदनशीलपणे यंत्रणा राबवून त्यांनी भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन केले. वसंतरावांच्या कार्यकाळात सतत तीन वर्षे दुष्काळ पडला. त्यांनी राज्यभर दुष्काळी दौरे करून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यातील जनतेला दिलासा दिला. हीच योजना पुढे देशपातळीवर स्वीकारण्यात आली. हरितक्रांतीचे प्रणेते अशी ओळख असलेले वसंतराव नाईक 18 ऑगस्ट 1979 रोजी अनंतात विलीन झाले. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन ! 
   

● डॉ. सुभाष राठोड, पुणे

मुळगाव  : नायगाव ता.मंठा जि.जालना