पावसाचे पाणी गावकऱ्यांच्या घरात

edit

ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका

edit

मोहाडी : अल्पशा पाऊस जरी पडला तरी पावसाचे पाणी सरळ गावकऱ्यांच्या घरात शिरण्याचा प्रकार तालुक्यातील सालई खुर्द येथे पहावयास मिळत आहे. यावर मात्र ग्रामपंचायतीने कोणत्याही उपायोजना केल्या नसून ग्रामपंचायतीच्या अश्या नियोजनशून्य कारभाराचा फटका गावकऱ्यांना बसत आहे. परवा आलेल्या अल्पशा पावसामुळे गावातील नाल्या तुडूंब भरल्या व गावकऱ्यांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. गावकऱ्यांनी सदर समस्या बाबत ग्रामपंचायतीला जाणीव सुध्दा करून दिली. मात्रमन्साराम लिल्हारे, रामचंद्र कोहळे, मदन हिरापुरे, प्रफुल मेश्राम, ललिता हिरापुरे, झनकलाल दमाहे, छोटेलाल लिल्हारे, राजू लिल्हारे, ईश्वर हिरापुरे, पुरुषोत्तम तुरकर आदी गावकऱ्यांच्या घरात व विहिरीत पाणी शिरून त्यांचे आर्थिक नुकसान झाले. ही नित्याचीच बाब झाली आहे. मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द हे जवळपास 3 हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. गावात ग्रामपंचायत सदस्य संख्या ९ आहे. मात्र येथे ग्रामपंचायत नियोजन शून्य कारभारामुळे गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तिन हजार लोकसंख्या असलेल्या या गावात नऊ ग्रा.पं. सदस्य आहेत. सांडपाणी वाहून जाण्यासाठी बनविण्यात आलेल्या नाल्याचे योग्य नियोजन न करण्यात आल्याने ही समस्या उदभवली आहे.. शिवाय नाल्याची नियमित सफाई सुद्धा होत नसल्याचे दिसून येते. गावकऱ्यांनी याबाबत अनेक तक्रारी केल्या. मात्र गावचे पदाधिकारी लक्ष देत नसल्याने मागच्या वर्षी घरात पाणी शिरल्याने लोकांनी रस्त्यावर चक्काजाम करून पदाधिकाऱ्यांच्या घरावर मोर्चा काढला होता परंतु परिस्थिती जैसे थेच आहे. त्यामुळे शासन-प्रशासन, पदाधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देऊन समस्या निराकरण करावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.