पिंपळ, शेवगा, पपई इत्यादी प्रकारची झाडे घराभोवती असू नये, याला शास्त्रीय आधार काय आहे?

माझ्या एका मित्राच्या कुटुबावर अचानक एकापाठोपाठ काही आपत्ति आल्या. अशा प्रसंगी इतर जवळपास सर्वच करतात तेच मित्राच्या आईने केले ; एका स्वघोषित पप्पू (परमपूज्य) महाराज ला शरण गेली. त्या पप्पूने पाच-दहा दगड मारून पाहिले, त्यातील एक अचूक लक्षावर बसला म्हणजे काय तर त्या पप्पू ने विचारले कि "तुमच्या अंगणात काळे फळ लागणारे झाड आहे काय?" योगायोग म्हणजे त्यांच्या अंगणात एक मोठा 'जामून' वृक्ष होता. हे झाड अतिशय देखने, गर्द सावली व मोठ्या आकाराची अतिशय रूचकर जाम्हणं लागणारे होते. त्या पप्पू ने, ते झाड अंगणात असल्यानेच तुमच्या घरावर संकटं येत आहेत तेंव्हा ताबडतोब तोडून टाकायचा सल्ला दिला.

तो वृक्ष मित्राच्या वडिलांनी विस वर्षांपूर्वी आपल्या नव्या घराच्या गृहप्रवेश च्या वेळी लावला होता. मावशीला ते झाड न तोडन्याबद्दल मी खूप समजावून पाहिले. परंतु काही एक उपयोग झाला नाही व त्या झाडावर कुर्हाड चालवली गेली. बरे, मग त्या पप्पू च्या सल्ल्याने काळ्या रंगाची फळे देणारे ते झाड तोडल्याने त्यांच्या वरची संकटं संपली काय?! नाही, उलट संकटं अधिक गडद झाली! पुढे वर्षभरात बरेच क्लेश सहन करावे लागल्या नंतर सर्व काही ठिकठाक झाले.

माझ्या घराभोवती मोठमोठे अशोक वृक्ष आहेत, बरेच लोक ते काढून टाकण्याचा अनाहूत सल्ला देतात. का? विचारले तर अशोक वृक्ष अशुभ असतो असे सांगतात. मला हे समजत नाही कि कोणताही वृक्ष अशुभ कसा असू शकताे!?

पिंपळ, शेवगा व पपई वगैरे झाडी घराभोवती असू नयेत याला काही शास्त्रीय कारण असेल तर मला त्याची काही माहिती नाही. परंतू आमच्या कडे, खान्देशात अनेक खेडी अशी आहेत की ज्या मध्ये जिकडे नजर टाकली तिकडे पिंपळ दिसतात, अर्थात या मागे पिंपळ हा देव वृक्ष असल्याची भावना आहे. पिंपळा पासून काही त्रास असलाच तर त्या खेडूतांची तक्रार असायला हवी होती, तशी काही तक्रार नाही, म्हणजेच पिंपळ वृक्षापासून काही हानी होत नाही. पिंपळ हा पक्षांचे आवडते निवास स्थान आहे, विषेशतः बगळे पिंपळा वर बसून रात्र काढायचे पसंत करतात. रात्रभर खाली पडणारी बगळ्यांची व इतर पक्षांची विष्ठा ही एक समस्या असू शकते, मात्र दुर्दैवाने एव्हडे पक्षी तरी कोठे शिल्लक राहिले आहेत आता!

आणि,समजा कि ही झाडे घराभोवती असू नये याला काही शास्त्रीय कारणे असतील ही, तर मला सांगा सकाळ पासून ते थेट झोपेत सुद्धा आपण करू नये अशी, आपल्या शारीरिक स्वास्थ्यासाठी घातक अशी किती कामे करत असतो! साधी गोष्ट आहे, रस्त्यावरून जाणारी वाहने विनाकारण हॉर्न वाजवून आपले मानसिक स्वास्थ्य बिघडवत असतात ; काय करू शकतो आपण या बाबतीत? करणार काय आपण अशा प्रत्येकाशी भांडण?

एक वृक्ष प्रेमी म्हणून माझी आपणास आग्रहाची विनंती आहे : कृपया वृक्षांसंबंधी हानीकारक बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे आणि झाडे तोडण्याचा सल्ला देणारे बाबा, महाराज, तथाकथित वास्तुविशारद यांच्या आहारी जाऊन झाडे तोडून आपल्याच पायावर कुर्हाड चालवू नये.

जय हिंद।