कवी रा. वि शिशुपाल यांनी साहित्याच्या विविध प्रकारांमध्ये लेखन केले आहे. त्यांचे सहा कवितासंग्रह,कथासंग्रह आणि ध्वनिफिती यावरून त्यांच्या लेखनविषयांच्या विविधतेची कल्पना येते. ग्रामीण भागामध्ये प्रबोधन करणारे एक यशस्वी कवी म्हणून ते ख्यातकीर्त आहेत.

कवी रा. वि शिशुपालांची कविता म्हणजे अर्थवान शब्दांचा सौन्दर्यसंपन्न अविष्कार आहे.मायमराठीची बूज आणि लाज राविंसारख्या कवींनीच राखली आहे.मातीवर प्रेम करणारी माणसचं कवितेवर प्रेम करू शकतात.

ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात शिक्षकी पेशाची मनापासून आवड आणि त्यामुळे प्रामाणिक सेवा करताना स्वतःच्या कामावर, कर्तृत्वावर ठाम निष्ठा ठेवून ध्येयवादातून आशादायी प्रयत्न करणारा जिद्दी आणि खंबीर मनाचा, धाडसी आणि क्रांतिकारी विचारांचा माणसातला माणूस म्हणून रा.वि. शिशुपाल यांचा कथा, कविता आणि इतर वैचारिक लेखनाचा अथक प्रवास आहे.

आतापर्यंत अनेक साप्ताहिके, मासिके, दैनिके, दिवाळी अंक यामधून त्यांच्या भरपूर कथा-कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.त्यांनी अनेकवेळा आकाशवाणी पुणे केंद्रावरून कविता वाचनहि केले आहे .अनेक पुरस्काराचे ते मानकरी आहेत.