सोमर्डी हे गाव जावळी तालुक्या मधले मध्यम आकाराची लोक वस्ती असलेले कुडाळी नदी जवळ सह्याद्री रांगेमध्ये डोंगरपायथ्यास पाचवड-पाचगणी रस्त्याकडेला राष्टीय महामार्ग क्र.- ४ वरील पाचवड पासुन ६ मैल अंतरावर वसलेले एकपेठी रचना असलेले यवनकालीन गाव आहे. जुन्या ढोबळ मापाने ग़ावास एकुण १० चाहूर जमीन असुन त्या पैकी १ चाहूर डोंगर असुन बाकीचे ९ चाहूर शेती व इतर जमीन आहे. मौजे जांभूळने, बावधन, वडाचे म्हसवे, शेते, बामणोली, आखाडे, आणी कोलेवाडी ही शेजारील गावे आहेत. गावामध्ये ग्रामदैवत भवानी देवीचे मंदिर असुन त्या मध्ये भवानी, जोगुबाई (जोगेश्वरी) आणी भैरोबा (भैरवनाथ) या देवतांच्या काळ्या पाषाणातील अत्यंत सुबक प्राचीन तीन मूर्ती आहेत. मुर्तीचे मुख व मंदिराचे द्वार उत्तरेस डोंगर मूखी असुन डोंगराच्या कड्यामध्ये शिप्याच्या दंडावर भवानी देवी शिवकाळात तुळजापूरहुन आसले, सोमर्डी व नंतर प्रतापगड येथे गेल्याची अख्यायीका आहे. ज्या ठिकाणी देवी गेली आणी मुक्कामी राहिली तिथे तिथे तिची मंदिरे बांधण्यात आली. भवानी देवी जागृत देवस्तान असुन पुर्वीचे मंदिर कौलारु लाकडी होते पण आता परंतु वाढत्या प्रसिद्धीने मंदिराचा नविन जिर्नोद्धार करण्यात आला आहे. श्री भवानीचे स्थान त्रिगुणात्मक म्हणजेच तमोगुणात्मक , रजोगुणात्मक, सत्वगुणात्मक तिन्ही अंशाचे अधिष्ठान समजले जाते. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता, अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे. मंदिरा शेजारी पिण्याच्या पाण्याची दगडी बांधकामातील विहिर असुन येथील खडकातील क्षारयुक्त पाणी गावच्या रहिवाशांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवते. उत्तरेकडील डोंगरपायथ्यास एक मोठी दगडी शीळा असुन तीच्यावर साठ शिवलिंगे कोरलेली आहेत म्हनुण त्या शिळेस साठ्लिंग नावाने ओळखतात. साठ्लिंगा वरून पुढे सरळवर डोंगरावर एक कडा चढुन गेलेवर एक छोटेसे तळे आहे ही डोंगरावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे. तिथुन पुढे डाव्या बाजुस झाडाझुडूपांचा परिसर आहे त्यास काळुबाईचीपाटी म्हणतात व तिथुन पश्चिमेकडे कड्यावरील आड्व्या मारुतिचे पाषाण आहे. व त्यापुढे खिंड्जाई देवस्तान असुन चिंचखिंड मार्गे वाइतालुक्यास जाणेसाठी कच्या पायवाटेचा रस्ता आहे तिथे. तळे चढुन वर गेले की डोंगराच्या सर्वोत्तम उंची वरिल भागास गोमाटी असे म्हणतात तिथे वर्षभर प्रचन्ड वारे वाहत असते तिथून पुढे पंडवकालीन वैराटगडाकडे जाणेस पायवाट रस्ता आहे. चिंचखिंडीमध्ये चिंचेची झाडे असलेने चिंचखिंड नाव पडले असावे. शिप्याच्या दंडावरुन पुढे कड्यावरुन पुढे उंचावर एक टेबल खुर्चीच्या आकाराचे दगड आहेत तिथुन पुढे डोंगराच्या पूर्वेकडे वाघदरामार्गे असलेल्या उंच भागाला घेरा किवा पेढा असेही म्हणतात. घेर्यावरुन सरळ खाली गावाकडे वाघजाई मार्गे गावाकडे येण्यास पायवाट आहे. साठ्लिंगाकडे जाताना डाव्या बाजुस पाझर तलाव लागतो सन १९७२ च्या दरम्यान राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडल्याने तत्कालीन राज्य सरकारने लोकांच्या हाताला काम मिळावे म्हणून रोजगार हमी योजना सुरू केली आणि या योजनेच्या माध्यमातून तत्कालीन जावळी तालुक्याचे सभापति संपतराव परामणे यांच्या प्रयत्नातुन पाझर तलावाची निर्मिती झाली. उत्तरेकडील डोंगरातुन दक्षिणमुखी अनुक्रमे शिवेचाओढा, जाळीचाओढा (नंदीचाओढा), बावीचाओढा, मागलाओढा आणी भैरोबाचाओढा असे पाच ओढे वाहतात. येथिल भैरोबाच्या ओढ्यावर कारखानदेश शिवारात धरणानजीक म्हसोबाचे देवस्तान आहे. सोमर्डी गावचे फाटा व गावठाण हे मुख्य दोन भाग पडतात. गावठानात जाताना कांबळेंच्या आम्ब्या जवळ वेताळबाचा (वेताळ) दगड आहे. भवानी ओढ्याकडेस एक ब्रिटिशकालीन जुनी दगडी विहिर असून पुर्वी तिथे धुणे धुतले जात असे तसेच पुढे २०० वर्ष जुना पिंपळाचा पार आणी कोंडवाडा आहे. दोन ओढे जेथे एकमेकाना मिळ्तात तेथे “आकर” नावाची हॉलिबॉल, कबड्डी खेळणेसाठी सामाइक जागा असुन तिथे भैरोबाचे छोटेसे मंदिर आहे. सोमर्डी फाट्यावर कुडाळ कडे जाताना नंदिमहादेवाचे मंदिर असुन त्यामध्ये शंकराची पिंड असुन मंदिराच्या समोर नंदी आहे. पुर्वी येथे नंदिबैल पुरला होता आणी जुन्या दवाखान्याचे सोलापुरचे ठेकेदार श्री टेंबे यांच्या स्वप्नामध्ये दृष्टांत झाल्याने त्यानी येथे नंदीची प्रतिष्ठापना केली आणी पुढे श्री जगन्नाथ जाधव यानी पिंडीची प्रतिष्ठापना केली असे कळते. दसर्याच्या दिवशी संध्याकाळी भवानी मंदिरातून मिरवणुकीला प्रारंभ होतो सायंकाळी शेतेच्या वेशी मार्गे महाकाली (म्हाकाळी) नंतर लक्ष्मीचे टेक मार्गे सीमोल्लंघन करुण नंदिचे मंदिर येथे सोने लुटण्याचा म्हणजेच शमीची पाने देवून गावकर्यांचा एकमेकाना भेटण्याचा कार्यक्रम होतो यावेळी देवीस कंदी पेढे वाटण्याची प्रथा पडली. गावचे ग्रामदैवत असलेल्या भवानी देवीची जत्रा हनुमान जयंतीच्या दुसर्या दिवशी भरते. यावेळी रात्री देवीची भवानी मंदिरा पासुन मारुति मंदिरा पर्यनत चंदीच्या मुर्तीची वाघाच्या कातडी अंथरलेल्या पालखीतुन ढोल ताशाच्या गजरात वाजतगाजत मिरवणुक निघते व मारुति मंदिरा समोर छ्बिन्याचा कर्यक्रम होतो. पुर्वीच्या काळी लोकाना उत्तर दिशा कळावी तसेच शक्तीची देवता म्हणून मारुतिची स्थापना येथिल ग्रामस्थांनी केली. पुर्वी गावात वाघ, बिबटे, तरस, भेकर, रानडुककर, या जंगली जनावरांच्या पासुन संरक्षण करणे करिता गेणू तुकाराम, आण्णा तुकाराम, बाळा कृष्णा परामणे, बापु शेलार तसेच शंकर गेणू भिलारे यांचेकडे दारु ठासणीच्या बंदुका होत्या. १९५७ साली बंदुकीचे लाखे (फासे) करुन वाघ मारला होता. गावामध्ये परामणे यांच्या पाटलाचावाडा, पड्याललावाडा, नवावाडा, गणूचावाडा, आणी वरलाआवाड (झकुच आवाड) यापाच प्रमुख भावकीचे जुने वाडे आहेत तर जाधव, भिलारे, शिर्के, शेलार, चोरगे, साळुंखे, गावडे, रांजणे, सोनावणे, यांची जुनी घरे आहेत. कुंभार, गुरव, कांबळे, येथील जुने रहिवाशी असुन फाट्यावर तरडे, यादव, दरेकर, गोळे, पवार, पारखे, निकम, लोहार, जगताप, महामुनी, मोमीन, शेडगे, इ. नव्याने वास्त्व्यास आलेल्यांची घरे आहेत. नंदिमहादेवाचे मंदिराजवळ “संपतराव परामणे ग्रामीण रुग्णालय” आहे सोमर्डीचे दानशूर ग्रामस्थ संपतराव परामणे, तानाजी परामणे, गेणू परामणे आदींनी या रुग्णालयासाठी जागा दिल्याने येथे २००६ साली तीस खाटांचे ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज इमारत उभारण्यात आली. दररोज किमान १०० रुग्णांची येथे तपासणीसाठी गर्दी होते असते. येथील विहिरीस एवढे पाणी आहे की येथिल जिवंत पाण्याचे झरे मुजविण्यात आले आहेत. फाट्यावर नेताजी सुभाषचंद्र बोस सार्वजनीक वाचनालय असून त्यामार्फत विविध कर्यक्रम केले जातात. जवळच इयत्ता सातवी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा असून आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे, म्हणून पालक नेहमी सतर्क असतात. चौकातुन बामणोली गावास जाणेस रस्ता असुन कुडाळी नदीच्या अलीकडे ब्रिटिशा विरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात वीर मरण आलेले स्वातंत्र्यसैनिक श्री सर्जेराव जाधव यांच्या स्मरणार्थ हुतात्मा स्मारकाची देखणी इमारत गणी डोहा नजिक सरकारने उभारली आहे. येथुन थोडे अलीकडे आख़ाड्पाणंद रस्ता असुन यामार्गे चिलावळे नावाच्या कुडाळी नदीच्या खोल डोहातुन गावठाणला जाता येते. येथे सोमर्डी-शेते विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे मुख्य प्रशासकीय कर्यालय असुन त्यामर्फत कर्ज वाट्प केले जाते. शेती हा येथील मुख्य व्यावसाय असून येथे खरीप हंगामात घेवडा, बाजरी सोयाबीन, भुईमूग, तांदूळ, करडई, बटाटा, मिरची,धने, मूग, चवळी, कारळा, वाटाणा, भात तर रब्बी हंगामात मका, ज्वारी, , गहू, हरभरा, कांदा व लसुण तर उन्हाळी हंगाम व सर्वसाधारण क्षेत्रात उस, स्ट्रॉबेरी, हळद, - गवार, शेवगा, टोमॅटो, मेथी, देशी वाटाणा तेली-पावटा, काळा घेवडा, कडवेवाल, शिमला मिरची, कोबी, फ्लावर, स्वीटकॉर्न, इतर भाजीपाला, इ. पिके तसेच इतर ड्रगनफ्रुट, कलिंगड, टरबुज, विविध प्रजातिंचा रायवळ अंबा, जांभूळ, शिताफळ, रामफळ, नारळ, चिंच, देशीबोरे, राजबेरी (तुती), कवठ, टेम्बुर्णी, आवळा, फळपिके घेतली जातात. साग, साल, आइन, शिवर, खैर, पिपळ, वड, हाळदु, निलिगीर, किंजळ, कडुलिम्ब, बाभुळ, भोकर, गेळे, तिवस, काटीकळक, बांबू, गुलमोहर, निरगुडी, शेर, रुई, करंज, दुर्मीळ पळस, बिब्बे ही झाडे शिवारात अढ्ळतात. विहीर, धोम उजवा कालवा, कुडाळी नदी, पाझर तलाव, ओढयाचे पोट्पाट, कोल्हापुर प्रकारचे बंधारे, शेत-तळे, आणी आता महु-हातगेघ्रर डाव्या बंदिस्त कालव्या द्वारे सिंचनासाठी उपयोग केला जातो. गावामध्ये दोन सॉ-मिल असुन येथुन लाकडाचा व्यापार होतो तसेच गावामध्ये आता गावामधे ग्रिनहाउस, विट्भटी, कुकुट्पालनाचा व्यावसायही केला जातो. कुडाळ रस्त्यावर गावात शीरतानाच रामफुल कृषी पर्यटन केंद्र असुन येथे निवासाची व ग्रामीण जीवनाचा अस्वाद घेणेची उत्तम प्रकारची सोय आहे. सोमर्डी येथुन पुढे पांडवकालीन वैराटगड ट्रेकिंग, महु-हातगेघर धरण, कास बामणोली, कासपठार, वासोटा किल्ला, पाचगणी, महबळेश्वर, आंबेनळी घाट मार्गे प्रतापगड मार्गे तळ कोकणात जाता येते. पाचगणी महाबळेश्वर बरोबरच संजीवनी हायस्कुल पाचगणी येथुन खाली ९ मैल अंदाजे १२ किमी अंतरावर खाली पर्यटनासाठी गावास भेट देणे उत्तम पर्याय आहे. शब्दांकन.....श्री सागर परामणे.